आगळी व्यक्तीमत्वे

     आपण आपल्या रोजच्या आयुष्यात नवनवीन लोकांना भेटत असतो, नवनवीन अनुभव घेत असतो, नवनवीन वृत्ती आणि प्रवृत्तींसोबत वावरत असतो. ह्या भेटींमधून,अनुभवांतून नवीन काही शिकत असतो, त्यातून आनंद आणि समाधान प्राप्त करीत असतो. आयुष्याच्या ह्या प्रवासात किती व्यक्ती त्यांच्या वृती, प्रवृती आणि प्रकृतीची ओळख झाल्यावर, त्यांच्यातील वेगवेगळ्या रसायनाच्या अभ्यासामधून आपल्याला नवीन उर्जाही प्राप्त होत असते. ह्या उर्जेतून जगण्याच्या नवीन कलेची जाणीव होत असते.
     खरंतर माणसं माणसं असतात हे एक साधारण आणि सामान्य वाक्य; परंतु ह्या माणसातलं माणूसपण आणि वेगळेपण प्रत्येकाच्या आगळ्या व्यक्तिमत्वाची दखल घ्यायला भाग पाडत असतं.    
     प्रत्येक माणसाची एक वेगळी ओळख असते आणि हीच ओळख प्रत्येकाला एकमेकांच्या व्यक्तीमत्वाकडे अधिक आकर्षित करीत असते. आपल्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वांमधून भेटणारी ही माणसं ही कधी आपलीही असतात, कधी आपली नसली तरी आपली वाटणारी असतात आणि आपल्यातील आपलेपण शोधणारीही असतात. त्यांच्या स्वभावातून, वागण्यातून आणि संवादांमधून एक वेगळी अनुभूती त्यांच्या सभोवतालच्या लोकांना येत असते.
     काही बोलण्यात पटाईत असतात, काही त्यांच्या लेखनातून आपला प्रभाव टाकत असतात, काही त्यांच्या कार्यशैलीद्वारे लोकांना आवडत असतात, काहींचे साधे वागण्यातून ते अनेकांच्या हृदयापर्यंत सहजपणे पोहचत असतात, काहीजण आपल्या हस-या चेह-यातून समोरच्याला आनंद आणि समाधान देत असतात, आपल्या संभाषणातून इतरांना आश्वस्त करीत असतात, धीर देत असतात, सांभाळून घेत असतात.  तर काहीजण आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे अनेकांना आकर्षित करीत असतात. अनेकजण मित्र बनविण्यात पटाईत असतात, अनेकजण त्यांच्या कुठल्या ना कुठल्या छंदामुळे लोकांमध्ये प्रिय झालेले असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृति’ ह्या उक्तीप्रमाणे अनेकांचे अनेक गुण लक्षवेधी ठरत असतात आणि त्यामुळेच अशी माणसे आपली असली ना की आपल्या आयुष्यात आपल्याला देवाने भरपूर काही दिले आहे ह्याची जाणीव आपल्याला कायमच होत असते.
     परंतु प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रत्येकवेळी अशी व्यक्तिमत्वे येतीलच असे नाही ना होत. सुख तिथं दु:खं, चांगलं तिथं वाईट, शक्य तिथं अशक्य, खरं तिथं खोटं, स्वस्थता तिथे अस्वस्थता, समाधान तिथे असमाधान त्याचप्रमाणे सभ्य आणि आनंद देणा-या व्यक्तिमत्वांसह असभ्य आणि वेदना देणारी व्यक्तिमत्वेही आपल्याला भेटत असतातच. अशा व्यक्तिमत्वांच्या भेटीतून आणि त्यांच्या संभाषणातून अतिशय वाईट अनुभवाशिवाय काहीच मिळत नाही. ही अशी माणसं आपल्या आयुष्यातच नव्हे तर ह्या पृथ्वितलावर का निर्माण झालीत असे विखारयुक्त विचारही आपल्या मनांत डोकावून जात असतात. त्यांच्याशी सख्य करण्याची आपली मुळी इच्छाच होत नाही तर त्यांच्यापासून आपल्यासारखे सामान्यजण कायमच चार हात दूर होण्याचाच प्रयत्न करीत असतात. अशा खलप्रवृत्तीच्या माणसांची संख्या ह्या कलीयुगात दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे. आपल्या प्रत्येक पावलावर अशी माणसे आपल्याला भेटत असतात, आपल्या आयुष्यातील काही सुखाचे आणि आनंदाचे क्षण आपल्यापासून ओरबाडून केवळ स्वत:ची सुखलालसा शमविणारी व्यक्तिमत्वे शेकडोनी मिळतात आताशा. अशांपासून स्वत:ला वाचवायचे असेल तर आपल्या सुविचारांची कक्षा तर रुंदावायच्या असतात तर अशांना योग्य ती समज आणि शिक्षा देण्यासाठीची वृत्ती आणि बळही स्वत:मध्ये निर्माण करणे आवश्यक आहे.
     संस्कृती, सुसंस्कार, सुविचार, सुसंवाद ह्यासोबतच सुसंगतीच्या मजबूत आधारावरची नवीन व्यक्तिमत्वे नव्या पिढीतून शोधून त्यांच्या सहकार्यातून नवतरुणाची सुसभ्य पिढी निर्माण करावी लागेल. राष्ट्रप्रेमी, राष्ट्रभक्त आणि राष्ट्रीय विचारांचे आदान-प्रदान करणारे युवक-युवती निर्माण करणा-या संस्थांचे संपादन, संगोपन आणि मजबुतीकरण हे महत्वाचे झालेले आहे. आपण स्वत: खूप मोठे काही करण्यास असमर्थ आहोत असे जर आपल्यास वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. कारण आपल्या छोट्याश्या कृतीतूनही आपण एवढ्या मोठ्या गोवर्धनाला उचलण्यासाठी आपली करंगळी तर लावूच शकतो ना.
     आपल्या राष्ट्रीय बाण्याच्या विचारांना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न आपल्यासारख्या सामान्यांना करावयाचा आहे, नव्हे ती आपलीच जबाबदारी आहे हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही ना तोपर्यंत आपल्या सभोवतालची ही खल वृती आणि प्रवृत्ती पूर्णत: नष्ट करणे अशक्यच आहे. खरंतर राष्ट्रीय विचारांनी आणि राष्ट्रविकासासाठी कार्य करणारी व्यक्तिमत्वे आताशा दृष्टीपथास यायला लागलेली आहे, त्यांना सामान्य जनतेचा संपूर्ण सकारात्मक पाठींबाही मिळतो आहे ही समाधानाची बाब आहे. परंतु त्यांना विरोध करणारी आणि त्यांचेविरूध्द राष्ट्रविरोधी गरळ ओकणारेही तेव्हढ्याच शक्तिने पुढे येत आहेत. त्यामुळे सभ्य, सुविचारी, सदाचारी आणि राष्ट्रप्रेमींना प्रेरीत करण्यासाठी त्यांचे मागे उभे राहून त्यांना बळ देण्यासाठी सामान्यांनी ‘आपले घर बरे आणि आपण बरे’ ही वृत्ती आतातरी सोडावयास हवी.        
     आनंद, समाधान आणि सकारात्मक विचार देणारी व्यक्तिमत्वे ही केवळ समाजाचे भूषण नसतात तर आपल्या देशाच्या जडणघडणासाठीही ती तेवढीच आवश्यक अशीच असतात. अशी अनेक व्यक्तिमत्वे आपल्या राष्ट्रात निर्माण झालेली आहेत आणि त्यांच्यामुळेच आपल्या राष्ट्राची संस्कृती अबाधीत राहीलेली आहे. त्या केवळ महनीयच नाही तर पूजनीयही झालेली आहेत. अशा व्यक्तिंच्या प्रेरणेनेच राष्ट्राने प्रगतीही केलेली आहे आणि आजही प्रगती करीत आहे. अशा महनीय आणि पूजनीय व्यक्तिमत्वांची आठवण करून आपल्या पुढील पिढीला त्यांची ओळख करून देणे हे आपले कर्तव्य आहे हे आपण लक्षात घेतले पाहीजे. त्यांच्या स्वभावाचा, सुविचाराचा, सद्‌गुणांचा प्रभाव नव्या पिढीपर्यंत पोहचवायास हवा.

मधुसूदन (मदन) पुराणिक, चंद्रपूर मोबा.9403194400

Comments