लहानपण देगा देवा...

आपण आपलेपण जपायला सहज शिकून  जातो, अगदी आपल्याही नकळत; परंतु आपल्यातील आपलेपणा विसरुनच जातो, अजानतेपणाने नव्हे तर जाणूनबुजून. ह्याचं कारण आपण आपल्यातील थोरपण शोधत जगत असतो, इतरांचं थोरपण नजरेआड करुन. आपल्या कर्तृत्वाची उंची आपल्या आभाळात पोहचलेल्या पायांपासून मोजायची नसते तर आपल्या जमीनीवरील पायांपासून मोजायची असते  हेच आपण विसरुन गेलेलो असतो.
खरंतर आपण खूप काही विसरुन गेलेलो असतो ह्या कालौघात, अगदी आपलं स्वच्छ आणि सुंदर बालपणही. तुकारामांनी 'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...'अशी मागणी विठ्ठलाकडे केली आणि आपण स्वतःच स्वतःचं बालपण आपल्या हातानं संपवून टाकलं, ऐरावताचं सोंग घेत.

आपल्या संपूर्ण जीवनात ऐरावत बनण्याच्या चढाओढीत आपण आपल्याशी आणि आपल्यांशी चढाओढ करतो आहे, आपल्यांनाच आपल्या पायांखाली तुडवतो आहे ह्याची तमाही आपण बाळगलेली नसते. कालांतराने आपण आपल्याला ऐरावत समजून घेतो आणि अहंकाराचे चित्कार करीत आपल्यातील बळाचे स्तोम माजवत अधिकाधिक मदमस्त होत जातो.

खरंतर एवढ्यामोठ्या विश्वाच्या पसाऱ्यात आपण कुणीच नसतो. परंतु आपली स्थिती किंवा कुवत केवळ एका छोट्याशा डबक्यातील त्या केवळ डराव डराव करणाऱ्या मंडुकापेक्षा वेगळी नसतेच हे आपण ध्यानात घे नाही.

आपल्या खोट्या, संकुचित थोरपणाची झापडं आपण आपल्या डोळ्यावर ओढलेली असतात आणि ती झापडं काढण्याचा थोडासाही प्रयत्न आपल्यावर खरे प्रेम करणाऱ्या निस्वार्थी मैत्राने केलाना तरी आपण त्याची दखल घेत नाही, नव्हे अशा सच्च्या मैत्रीलाही आपण आपल्यापासून दूर करतो.

सारेच दिवस सारखे नसतात, अहंकाराचा केव्हाना केव्हा अंत होतच असतो. हा बदल आयुष्यात येणारच असतो. परंतु यशाच्या, थोरपणाच्या अहंकारात मश्गूल झालेल्या आणि अंध झालेल्या  ह्या ऐरावताला त्याची जाणीव केव्हा होणार
परंतु जेव्हा एक छोटीशी सामान्य मुंगी त्याचे तेजोहरण करते, त्याला जमीनीवर लोळवते ना तेव्हा सारे संपलेले असते.
हे आतापर्यंत सांभाळलेले थोरपण संपून जाते आणि भावनेच्या भग्न अवस्थेतील आपल्याला आपण आपल्या भूतकाळाच्या आरशात शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा तो आरसाही आपली स्पष्ट प्रतिमा नाही दाखवू शकत. अशावेळी आपण आपल्यातील स्वच्छ मनाने त्या आरशावरील धूळ पूसायची असते, आपल्या आयुष्यातील आपल्या चुकांचे परिमार्जन करुन आणि अहंपणाचे सावट दूर करुन आपली प्रतिमा आपल्याला आणि आपल्यांनाही सुस्पष्ट, स्वच्छ दिसावी ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे असतात.

सारं सोप नसतं परंतु सारं कठीणही नसतं. खरंतर सारं सोपं आपणच कठीण करुन टाकलेलं असतं. म्हणूनच हे कठीण झालेलं सोप करण्याची जबाबदारीही आपलीच असते.
आयुष्यातील आपण निर्माण केलेले अडथळे, अडचणी जाणून घेत त्यापासून आपल्यांची सोडवणूक जेव्हा आपण करुना तेव्हा आपण खऱ्या अर्थाने समाधानी होऊ. होय, परंतु त्यासाठी मुंगी होऊन जगण्याची वृत्ती स्वतःमध्ये निर्माण करता आली पाहीजे.

मधुसूदन (मदन) पुराणिक, चंद्रपूर मोबा क्र.9403194400

Comments